राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा सुरू असताना दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होत असताना दुसरीकडे राज्यात मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार कोटींच्या ‘पॅकेज’बाबत दावा करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यापाठोपाठ आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना थेट रेटकार्डच जाहीर केलं आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जात होते, याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला परिणामांची पूर्ण कल्पना आहे”

संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीकास्र सोडलं. दोन हजार कोटींचा आरोप करताना याच्या परिणामांची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असं राऊत म्हणाले. “निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवलं आहे. गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं. याचे काय परिणाम होणार याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आहे”, असं राऊत म्हणाले.

“मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की…”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट चर्चेत; जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं ‘ते’ विधान केलं शेअर!

“तुम्ही कार्यालयांचा ताबा घ्याल. पण खवळून उठलेल्या लाखो शिवसैनिकांचा ताबा कसा घ्याल? त्यांना कसं शांत करणार? शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा आहे, मराठी माणसाचा आवाज आहे. शिवसेना संपावी यासाठी दिल्लीश्वराने ६० वर्षांपासून प्रयत्न केले. ते आम्ही हाणून पाडले. आता काही लोकांना त्यात यश आलं असलं, तरी महाराष्ट्रातील जनता याविरोधात पेटून उठली आहे”, असंही राऊतांनी नमूद केलं.

Maharashtra News Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

रेटकार्ड आणि त्यातील दर!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार-पदाधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जात होते, याचं रेटकार्ड तयार केल्याचा गंभीर दावा केला. “या देशात, राज्यात कधी रेटकार्ड तयार झालं नव्हतं. त्यांनी रेटकार्ड तयार केलं होतं. नगरसेवकासाठी २ कोटी, आमदारासाठी ५० कोटी, खासदार ७५ कोटी, शाखाप्रमुखासाठी ५० लाख असं रेटकार्ड आहे. एक रेटकार्ड तयार करून त्यासाठी एजंटदेखील नियुक्त केले आहेत. हे एजंट लोकांना तोडण्यासाठी कमिशनवर काम करत आहेत. हे असं देशात पहिल्यांदा होतंय. कुठंय ईडी, इन्कम टॅक्स? त्यांच्याकडे अशी कोणती विचारसरणी आहे, ज्यासाठी ते हे सगळं सोडून जात आहेत”, असा गंभीर दावा संजय राऊतांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams eknath shinde group on supreme court hearing pmw