नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना थेट एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या या प्रस्तावानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यांदर्भात आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान मोदी हे भानावर नाहीत, त्यामुळेच ते अशा प्रकारची विधानं करत आहेत, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव, अनिल देशमुख म्हणाले; “या प…

काय म्हणाले संजय राऊत?

“या देशातून आम्हाला नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही नष्ट करायची आहे. हे आमचं स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही ४ जूननंतर पूर्ण करू. मी कालच सांगितलं आहे की नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही. ज्या पद्धतीने त्यांची भाषणं सुरू आहेत, ती पंतप्रधान पदाला शोभणारी नाहीत. आपण काल काय बोललो, आज काय बोलतोय याचं भान त्यांना नाही. त्यातूनच अशा प्रकारची विधानं येत आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींचा बुद्ध्यांक कमी आहे. त्यांनी आधी लिहायला आणि वाचायला शिकलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.

मोदींच्या प्रस्तावावर शरद पवारांनीही केलं भाष्य

दरम्यान, पतपंप्रधान मोदींच्या प्रस्तावावर शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. “आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.” असे ते म्हणाले.

हेही वाचा – “ज्यांना नकली म्हणायचं, त्यांच्यासमोरच हात पसरायचे”, मोदींनी शरद पावारांना दिलेल्या ऑफरवरून काँग्रेसचा टोला

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.