अनंत चतुर्दशीनिमित्त १० दिवसांच्या गणपती बाप्पांना आज निरोप देण्यासाठी महाराष्ट्रभर जल्लोष सुरू आहे. ठिकठिकाणी मानाचे गणपती विसर्जन करण्याकरता गर्दी जमली आहे. राजकीय नेतेमंडळींनीही ही संधी सोडलेली नाही. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील विघ्नहर्ता चिंतामणीचे आज दर्शन घेतले. हा बाप्पा नवसाला पावणारा असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा नवस पूर्ण होतोच, असा दावा त्यांनी केला आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी येथून मोदक घेतला असल्याचंही ते म्हणाले. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
संतोष बांगर म्हणाले की, “विघ्नहर्ता चिंतामणी या श्रीचं या ठिकाणी दर्शन घेतलं. मोदक घेतला आहे. हा मोदक २०१९ लाच घेतला होता. त्यावेळी साक्षात विघ्नहर्त्याने मनातील इच्छा पूर्ण केली. मी आता फक्त विघ्नहर्त्याला एवढंच साकडं घालेन की महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी राजाला सुखात ठेव, त्याच्या इच्छा पूर्ण होऊ देत.”
हेही वाचा >> “शेरास सव्वाशेर गुजराती, मारवाडी मराठी लोकांना लाथ घालतो तेव्हा…”, मुंबईतील ‘त्या’ प्रकारावर आव्हाडांची टिप्पणी
“या विघ्नहर्त्याचं वैशिष्ट्य आहे. ज्याने इथं संकल्प सोडला त्याचा नवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. २०१९ ला मी आमदार व्हावं म्हणून माझ्या घरच्यांनी मोदक घेतला होता. एका वर्षाच्या आत विघ्नहर्त्याने ती इच्छा पूर्ण केली. हिंदुस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहावं आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य राहावं, हे साकडं मी या विघ्नहर्त्याकडे घातलेलं आहे”, असंही ते म्हणाले.
“२०२४ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडून यावं याकरता मी मोदक घेतलेला आहे. ही इच्छा श्री पूर्ण केल्याशिवाय राहणार आहे”, असंही त्यांनी सांगितलं.