सातारा : जिल्हा सहकारी बँकेने बँकेत कामकाजासाठी ‘इन्फोसिस कंपनी’ची बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च सुरक्षा व अद्ययावत फिनॅकल ही ‘कोअर बँकिंग’ प्रणाली स्वीकारली आहे. यामुळे बँक ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर सुरक्षित व जलद व्यवहार करता येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत ‘पेपरलेस बँकिंग’ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसमवेत इन्फोसिस कंपनीच्या बंगळुरू येथील मुख्य कार्यालयास भेट दिली.

यावेळी संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे व विजयकुमार सावंत, उपव्यवस्थापक प्रशांत देशमुख व अधीक्षक वैभव सावंत, इन्फोसिस कंपनीचे व्यंकटरमणा गोसावी, हेड ऑफ सेल, राजशेखरा व्ही. मया व सुहास पाटील, व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी फिनॅकल कोअर प्रणालीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बँकेने संपूर्ण कामकाज २०१३ मध्ये कोअर बँकिंग प्रणालीमधून सुरू केले आहे. सर्व आधुनिक बँकिंग सुविधा मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने त्यातील सुरक्षिततेबाबतची जोखीम वाढली आहे. तसेच ही जोखीम भविष्यात वाढत जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन रिझर्व बँकेने बँकांसाठी सायबर सुरक्षितता मार्गदर्शक चौकटीची अंमलबजावणी करण्याबाबत बँकांना सूचना दिल्या आहेत.

या सर्व बाबी विचारात घेऊन बँकेकडे पुढील सुरक्षित एप्लिकेशन सॉफ्टवेअर असणे आवश्यक होते. फिनॅकल सीबीएस प्रणालीच्या अनुषंगाने इन्फोसिसच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान खासदार नितीन पाटील यांनी जिल्हा बँकेत पेपरलेस बँकिंग करणार असल्याचे सूचित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी बँकेचे पदाधिकारी व संचालकांच्या हस्ते इन्फोसिस कंपनीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यामध्ये नाबार्ड पुरस्कृत फिनॅकल एप्लिकेशन कार्यरत असलेल्या व जिल्हा बँकेने सुरू असलेल्या प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली.