सातारा : आज रविवारी सातारा जिल्ह्यासह माण खटाव तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे बाणगंगा आणि येरळा नदीच्या पाणीपात्रात घट झाली आहे. खटाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेला. शनिवारी सायंकाळी घटना घडली. सुरेश रघुनाथ गायकवाड, अंबवडे (ता खटाव) असे या व्यक्तीचे नाव आहे.
कायम दुष्काळी असा शिक्का असणाऱ्या माण खटाव तालुक्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे व दिवसभर अतिजोरदार पाऊस आला. यामुळे बाणगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे या परिसरातील ओढे नाले ही भरून वाहत होते. म्हसवडच्या बाजारपेठेत पाणी घुसले होते. सातारा पंढरपूर शिंगणापूर रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे अनेक वाहने या भागातच अडकून पडली होती. या परिसरात मोठा पाऊस झाल्याने सर्व पुलावरुन पाणी वाहत होते.
प्रशासने प्रशासनाने पूल ओलांडून जाऊ नये असे आवाहन नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांना केले होते. अनेक मार्गावरील वाहतूक ही बंद ठेवली होती. मात्र शनिवारी सायंकाळी अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून सुरेश रघुनाथ गायकवाड, अंबवडे (ता. खटाव) हे वाहून गेले. नदी पात्रात त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह एनडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी शोध मोहीम राबवत आहे. पोलिस प्रशासन ड्रोन च्या माध्यमातून शोध घेत आहेत.
अंबवडे गोरेगाव रस्त्यावरील असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. यावेळी त्या पुलावरून जाण्याचे धाडस करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही व्यक्ती पुरात वाहून गेली होती. सध्या या परिसरातील शेती अनेक रस्ते विहरी पाण्याखाली गेले आहेत. आज पावसाने उघडीप घेतल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा झाला आहे. आतापर्यंत भरण्याच्या प्रतीक्षेत असणारा राजेवाडी तलाव ही पूर्ण भरून वाहत आहे. पिके ही पाण्याखाली असल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक दुकाने आणि घरातही पाण्यात शिरल्याने नागरिक आणि ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्रांताधिकारी ऊज्वला गाडेकर,तहसिलदार विकास आहिरे व महसूल आणि पोलीस प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे त्यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या परिसरात मोठे नुकसान झाल्याने सातारा जिल्हा प्रशासनाचे सर्व लक्ष या भागावर केंद्रित झाले आहे. दरम्यान आज घटनास्थळी बचाव पथक , पोलिस, तलाठी, पोलिस पाटील, व शासकीय यंत्रणा पोहचली असून वाहून गेलेल्या व्यक्तीचे शोध कार्य सुरू आहे.