सातारा पालिकेच्या निवडणूकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीच्या विरोधात तगडा पर्याय देण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा आमदार शशिकांत शिंदे यांच्‍या उपस्‍थितीत निर्धार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा पालिकेत सद्या खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीने पालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र शहराच्‍या राजकारणात मागील अनेक वर्षांपासून उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्‍यात संघर्ष होत आहे. या दोन्‍ही राजेंच्या आघाड्यांच्‍या पारंपरिक सत्ता संघर्षाला भेदण्‍याचा प्रयत्न अनेकांनी केला, मात्र त्‍याला फारसे यश नाही. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे दोन्‍ही राजे भाजपामध्‍ये गेल्‍याने साताऱ्यात राष्‍ट्रवादीचे नेतृत्‍व उभे करण्‍यासाठीची संधी आहे. ती संधी साधत पालिका निवडणुकीसाठी आमदार शशिकांत शिंदे हे सातारा शहरात सक्रिय झाले आहेत.

पालिकांचे प्रभाग आरक्षण झाल्यांने जिल्ह्यात सातारा पालिका ही महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिकेसाठी पर्यायी आघाड्यांविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर सातारकरांना विकासकामांबाबत पर्याय देण्यासाठी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब बाबर यांनी शहरातील मान्यवर नागरीक, नगरसेवक यांची बैठक आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या बैठकीच्या संयोजनात महाविकास आघाडीतील घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व कॉँग्रेस पक्ष समर्थक पदाधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीला माजी उपाध्‍यक्ष ॲड. बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्‍लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमर गायकवाड, गिरीश मोडकर, स्‍नेहा अंजलकर, सलीम कच्‍छी, अमित कदम, अमृता पाटील, रावण गायकवाड, मोहनीस शेख, राहुल यादव, नंदकुमार कवारे व इतर नागरिक उपस्‍थित होते.

या बैठकीत सातारा शहराच्‍या विकासाच्‍या अनुषंगाने चर्चा झाल्‍यानंतर सातारा शहर महाविकास आघाडी निर्माण करण्‍यावर उपस्‍थितांनी सहमती दर्शवली. त्यानुसार आगामी काळात पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला. साताऱ्याच्‍या राजकारणात याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara meeting in the presence of mla shashikant shinde to give a option against udayan raje and shivendra singh raje in municipal elections msr