Maharashtra Bhushan Puraskar 2024: जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरातमधील ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भातली घोषणा केली आहे. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार यांचं वय १०० वर्षं आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्माराकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली.

राम सुतार यांचा जीवन परिचय…

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.

राम सुतार यांनी आत्तापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य.

२०१६ साली टागोर पुरस्काराने सन्मानित

अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे राम सुतार यांच्या कल्पनेतूनच साकारत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आता महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sculpture artist ram sutar to be awarderd by maharashtra bhushan 2024 devendra fadnavis announced pmw