अहिल्यानगर : विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता पोलिसांनी स्वतःहूनच शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना फिर्याद देण्यासाठी संपर्क साधूनही देवस्थानकडून फिर्याद दिली गेलेली नाही.

यासंदर्भात पाच बनावट ॲपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी फिर्याद दिली आहे. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान व भाविकांची ॲप वेबसाईटचा वापर करून आर्थिक फसवणूक केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात ४ जून रोजी शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी देवस्थान व भाविकांची बनावट दर्शन ॲपद्वारे फसवणूक झाल्याचा अर्ज दिला होता तसेच इतर दोन जणांनीही फसवणूक झाल्याचे अर्ज सायबर पोलिसांकडे दिले होते. सायबर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यामध्ये गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शनैश्वर देवस्थानचे अर्जदार व कार्यकारी अधिकाऱ्यांना पोलिसांनी वेळोवेळी संपर्क साधून तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा असे कळवले होते.

मात्र तरीही देवस्थानच्या वतीने कोणीही फिर्याद दिली नाही तसेच हे प्रकरण संवेदनशील असल्याने भाविकांची, संस्थानची फसवणूक थांबवण्यासाठी उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.

पाच ॲपधारक चालकांनी शनैश्वर देवस्थानची व्हीआयपी दर्शन बुकिंग, ऑनलाइन पूजा, अभिषेक व तेल चढावा बुकिंग करता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता व देवस्थानला कोणत्याही प्रकारची देणगी न देता भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम स्वीकारून देवस्थान व भाविकांची फसवणूक केल्याची फिर्याद आहे. त्यानुसार शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी नेवासा येथील आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत देवस्थानचे बनावट ॲप व देवस्थानच्या गैरकारभाराकडे लक्ष वेधले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फौजदारी कारवाईचे आश्वासन दिले होते.