छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केली आहे. आता शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला राष्ट्रवादी पक्षाकडून पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर स्पष्ट भूमिका व्यक्त करत म्हणाले, “राज्यसभेचा निकाल प्रत्येक पक्षाची किती ताकद यावर अवलंबून आहे. आम्ही महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सिमीत मी सांगतो, राज्यसभेत आमचा एक सदस्य निवडून यायला कोणतीही अडचण नाही. त्याची मतांची गरज भागून राष्ट्रवादीकडे १०-१२ मतं जादा शिल्लक राहतात.

“शिवसेनेकडे पण सरप्लस मतं, त्यांनाही अडचण नाही”

“शिवसेनेकडे पण सरप्लस मतं आहेत. त्यामुळे त्यांनाही काही अडचण नाही. राहता राहिला प्रश्न आमचा सहकारी पक्ष काँग्रेस तर त्यांच्याकडे देखील संख्याबळ आहे. कमी पडलं तर आम्ही मदत करू. आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ,” असं शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “आजपासून मी…”, आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात संभाजीराजे भोसलेंचा मोठा निर्णय!

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार निवडून येऊन महाविकास आघाडीकडे २७ मते शिल्लक राहतात तर, पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरून महाविकास आघाडीकडे एकूण ४६ मते शिल्लक राहतात. संभाजीराजे यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिल्लक मतांच्या आधारे संभाजीराजे सहजरित्या राज्यसभेत जाऊ शकतात. शरद पवारांच्या या पाठिंब्याच्या जोरावर संभाजीराजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar announce mva support to sambhajiraje chhatrapati in rajyasabha election 2022 pbs
First published on: 16-05-2022 at 19:40 IST