Sharad Pawar Wrote Letter to Ashwini Vaishnaw Over Demands for Konkani citizen : कोकणातील रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे कोकणवासी नेहमी ट्रेनने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मात्र, कोकणात ये-जा करण्यासाठी पुरेशा ट्रेन, एक्सप्रेस नसल्यामुळे कोकणातील नागरिक सातत्याने अधिक गाड्यांची, एक्सप्रेसच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करत असतात. तसेच अनेक महत्त्वाच्या व गर्दीच्या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा नसल्यामुळे मनःस्ताप व्यक्त करतात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याच मुद्द्याला हात घातला आहे. तसेच त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वेष्णव यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांनी कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या ‘कोकण रेल्वे’च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं. शरद पवार यांनी यासंदर्भात समाजमाध्यमांवर माहिती दिली आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची एक प्रत देखील शेअर केली आहे.
शरद पवारांचं रेल्वेमंत्र्यांना पत्र
शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील ‘सिंधुदुर्ग’ हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी सुप्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात व प्रमुख सणांच्या काळात म्हणजेच गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी दरम्यान निवडक एक्सप्रेस गाड्यांना कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्राद्वारे केली.”
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “एक्सप्रेस गाड्यांना तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा दिल्यामुळे तळकोकणातील आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासाची सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. तसेच सर्वसामान्य कोकणवासी माणसांच्या प्रलंबित मागणीला योग्य न्याय मिळेल.”