NCP(SP) Meeting in Mumbai : “दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे”, असं शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. तेव्हापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे विलिनीकरण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या या चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उद्या मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयकांना दिले आहेत. पण या बैठकीबाबत पुण्यातील पदाधिकाऱ्यांना माहिती नसल्याचंही समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“सर्व राज्य नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घेतली जाईल. आम्हाला बैठकीच्या अजेंड्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही, परंतु वेळेवर बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे”, असे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितले.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीत (अजित पवार) सामील होण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असं पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळेंना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, याबाबतचा निर्णय नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल.

विलिनीकरणाबाबत अंदाज लावला जाईल

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या पुणे युनिटचे प्रमुख प्रशांत जगताप म्हणाले की, “मला बैठकीची माहिती आहे, पण अजेंडा माहिती नाही. ज्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबद्दल अंदाज लावतील हे स्पष्ट आहे”, असं ते म्हणाले. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी पक्षाच्या एका गटाकडून दबाव येत असल्याचंही जगतापांनी मान्य केलं.

शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कार्यक्रम आणि व्यासपीठांवर एकत्र दिसत आहेत. अनेक जिल्हास्तरीय बैठकांमध्येही काका-पुतणे मांडीला मांडी लावून बसलेले दिसले. तसंच, शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाही उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे विलग झालेले हे दोन्ही गट एकत्र येतील अन्य राज्याला नवं समीकरण पाहायला मिळेल का हे पाहावं लागणार आहे.