Sharad Pawar NCP Protest Against Election Commission: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी काही सादरीकरणे करत निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले होते. अशा परिस्थितीत आज निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यालयाबाहेर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाचा लोगो असलेले बॅनर जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

निवडणूक आयोग चोर आहे

या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “निवडणूक आयोग चोर आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी असंख्य मते चोरली आहेत. याचे अनेक पुरावे देखील आम्ही दिले आहेत. भारताचं जे काही वाटोळं होत आहे, ते निवडणूक आयोगामुळेच होत आहे. ८५ वर्षीय शरद पवार लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधींचे भाजपाने आभार मानले पाहिजेत. त्यांनी सर्व जगासमोर हा प्रकार आणला. आम्ही भाजपाला भारतीय संविधानाशी खेळू देणार नाही. त्यांची सत्ता निवडणूक आयोगामुळे आली आहे. त्यामुळे हे आंदोलन होत आहे.”

दिल्लीतही निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

सोमवारी सकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतचोरीचा आरोप करत संसद भवन ते निवडणूक कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेतले.

बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष तपास मोहिमेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद परिसरापासून निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की ही संविधान वाचवण्याची लढाई आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “वास्तविकता अशी आहे की ते बोलू शकत नाहीत. सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे. ही एका माणसाची, एका मताची लढाई आहे. म्हणूनच आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे.” प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि म्हणाल्या की हे सरकार घाबरले आहे.