सोलापूर : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या, सरकारच्या विचारांशी सहमत नसलेल्या मंडळींवर दबाव टाकून दहशत निर्माण करून त्यांना नाउमेद करण्याचे विरोधी विचार संपविण्याचे प्रयत्न सत्ताधारी मंडळी करत आहेत. रोहित पवार यांना आलेली केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आलेले समन्स हा त्याचाच भाग आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केली.

सोलापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी, सरकारच्या विरोधात वेगळी भूमिका घेणा-यांना ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी यंत्रणांचा ससेमिरा लावला असताना त्याविरोधात न्यायालयात लढणे आणि वास्तव मांडण्याचे काम आम्ही करू, असे नमूद केले. केंद्रीत तपास यंत्रणांकडून यापूर्वी अनेकांना नोटिसा आल्या. शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते अनिल देमुख, नबाब मलिक आदींना कारागृहात डांबण्यात आले. गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांची लाच घेतल्याचे आरोप झाले. मात्र त्या प्रकरणात न्यायालयाने तपास यंत्रणांवर ताशेरे ओढून अनिल देशमुख यांना सोडून दिले. गृहमंत्री असलेल्या देशमुखांना खोट्या आरोपाखाली तुरूंगात जावे लागले. संजय राऊत यांनी सरकारच्या विरोधात लिहिल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर कारवाई झाली. मलाही ईडीकडून नोटीस आली होती. आता रोहित पवार यांना ईडीकडून समन्स आले आहे. कोकणातील उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. इतरांनाही ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. दर आठवड्याला ईडीकडून कोणाला तरी नोटीस येतेच. त्याला आता घाबरण्याचे आणि त्यावर चिंता करण्याचे कारण नाही, असे पवार यांनी त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने पाठविलेल्या समन्सबाबत सांगितले.

हेही वाचा >>>सांगली : प्रेयसीशी संबंधाच्या संशयावरुन मित्राचा खून

ते म्हणाले, मागच्या काळात आम्ही केंद्र सरकारमध्ये सत्तेत होतो. परंतु त्यावेळी आम्हाला ईडीची माहितीही नव्हती. सरकारच्या विरोधात भूमिका घेणा-या कोणावरही आकसाने, त्रिस देण्याच्या हेतूने ईडी किंवा अन्य सरकारी यंत्रणांकडून कारवाई झाली नव्हती. आता मोदी सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग करून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्याविरोधात लोकांमध्ये जाऊन जनजागृती करावी लागेल आणि या प्रवृत्तीच्या विरोधात जनमत जागृत करावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले.