Sharad Pawar on India-Pakistan Tension: भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. ८ मे पासून लागोपाठ तीन दिवस पाकिस्तानच्या लष्कराकडून भारतीय सीमेवरील राज्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंत पसरलेल्या सीमेवर ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र डागणे आणि लढाऊ विमानांमधून ठिकठिकाणी हल्ले सुरू आहेत. भारतीय लष्कराने सर्व हल्ले परतवून लावले असून अनेक ड्रोन, क्षेपणास्त्र निकामी केले आहेत. या सर्व घडामोडींवर देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अनुभव शरद पवारांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली.
भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचा आवाहन केले जात आहे. भारतानेही केवळ पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. भारताने स्वतःहून नागरी भागांना लक्ष्य केले नाही. पण पाकिस्तान जाणूनबुजून नागरी भाग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, गुरुद्वारे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर बॉम्ब टाकत आहे.
काय म्हणाले शरद पवार?
माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना बारामतीमध्ये भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “यामध्ये जास्त बोलायचे नसते तर थेट ॲक्शन घ्यायची असते.” शरद पवार यांच्या विधानातून भारतातील विरोधी पक्षांनी संयमीपणा दाखवत केंद्र सरकारला एकमताने पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, माजी मंत्री हे आंतरराष्ट्रीय माध्यमांना वारंवार मुलाखती देऊन भारताच्या नावाने गळे काढत आहेत. मात्र त्यांचा खोटारडेपणा रोजच्या रोज उघडा पडत आहे. दुसऱ्या बाजूला भारताकडून एकाही राजकीय नेत्याने माध्यमांना मुलाखती देऊन तणावावर भाष्य केलेले नाही. भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका अधिकृतपणे मांडण्यात येत आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी माध्यामांशी बोलत असताना भारत-पाकिस्तान तणावासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. “पाकिस्तान हा एक कमजोर लोकशाही असलेला देश आहे. त्यांची खरी सत्ता लष्कराकडे एकवटलेली असते. याधीही पाकिस्तानने कुरापती केलेल्या आहेत. मात्र आता ते उघडपणे हल्ले करत असून भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. त्यामुळे या विषयावर अधिक न बोललेले योग्य राहिल”, असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदींना किती देशांनी पाठिंबा दिला?
अमेरिकेने भारत-पाकिस्तान तणावात हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, याबद्दल पंतप्रधान मोदींनी खरंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना जाब विचारायला हवा. ट्रम्प यांच्या विजयासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले होते. खरेतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात टाकून त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. जगातील अनेक देश या विषयात तटस्थ राहिले आहेत. ट्रम्प यांचे तटस्थ राहणे हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.