अलिबाग – शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन मेळावा यावर्षी पनवेल येथे आयोजित केला आहे. या निमित्ताने शनिवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता, नवीन पनवेल येथे हा मेळावा होणार आहे. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य दिग्गज मंडळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्याची तयारी झाली आहे. गावोगावी, शहरी भागात ठिकठिकाणी कार्याकर्त्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकापचा वर्धापन दिन तथा मेळावा हा कार्यकर्त्यांना उमेद देणारा आहे. त्यामुळे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्यादेखील मोठी असणार आहे. यावर्षी १५ ते २० हजार कार्यकर्ते मेळाव्याला हजेरी लावतील असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
या मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप सोशल मिडीया प्रमूख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप सहचिटणीस अॅड. गौतम पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. मात्र याकडे राजकीयदृष्टया पाहू नये असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी जोरात सुरु केली आहे. महिला, तरुण, युवक, ज्येष्ठ अशा सर्वच कार्यकर्त्यांना हा मेळावा एक वेगळी शक्ती, उमेद देणारा असणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. या मेळाव्यातून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन कार्यकर्ता एक वेगळ्या उमेदीने निवडणूकांसाठी कामाला लागणार आहे. त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.
पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच
मागील वर्षी शेकापचा वर्धापन दिन मेळावा पंढरपूर येथे पार पडला होता. तो मेळावा वेगवेगळया कारणांनी गाजला होता. त्यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि त्यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासूनच पक्षातील मोठया फुटीचे संकेत मिळत होते. त्यानंतर विधानसभा निवडणूकीदरम्यान पक्षातील भाऊबंदकी थेटपणे समोर आली. आता पंडित पाटील, आस्वाद पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील प्रमुख मंडळी पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच पनवेल मधून जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शेकापचा वर्धापन दिन मेळावा कसा पार पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.