Shilpa Shetty : महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले आहेत. आता लवकरच तिसरा हप्ताही जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे असं विरोधकांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंनी तर निवडणूक आल्यानंतर आणि लोकसभेचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारला लाडकी बहीण आठवली असं म्हटलं आहे. तर संजय राऊत, उद्धव ठाकरेंनीही या योजनेवर टीका केली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) भाष्य केलं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत शिल्पाने यासंदर्भातली पोस्ट केली आहे.
गेल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा
गेल्या आठवड्यात लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे ही योजना चर्चेत आहे. तसंच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे.
आता ३१ ऑगस्टनंतर अर्ज दाखल केलेल्या महिलांनाही पैसे दिले जाणार
सध्या ३१ जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचे एकूण ३००० रुपये जमा केले जात आहेत. ३१ ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांनादेखील सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत ३ हजार रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण ४ हजार ५०० रुपये दिले जातील असं सांगण्यात आलं आहे. या योजनेचं अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) कौतुक केलं आहे.
काय आहे शिल्पा शेट्टीची पोस्ट?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) ‘मु्ख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे कौतुक केले आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राज्यातील महिलांना दिलासा देणारे असल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटले आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे. या महिलांना दर महिन्याला आर्थिक आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे, याचा आनंद वाटत असल्याचे शिल्पाने ( Shilpa Shetty ) सांगितले.
राज्य सरकारने हे उचललेले पाऊल म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करत असल्याचे शिल्पा शेट्टीने ( Shilpa Shetty ) तिच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd