मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यावरुन खासदार संजय राऊतांनी टोला लगावल्यानंतर आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यानंतर वारसा हा फक्त रक्ताच्या नात्याचा नसतो, तर विचारांचाही असतो. तोच विचार बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊतांनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खोचक सल्ला दिला. “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“फक्त हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला; बाळासाहेब ठाकरेंचाही केला उल्लेख!

“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाचं प्रत्युत्तर

“संजय राऊतांनी आधी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली हे सांगावं. मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं. आम्हाला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही,” असं प्रत्त्युत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलं आहे.

“बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसलं हे संजय राऊत यांनी सांगावं. सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कोणी दिली? खुर्चीसाठी आपण बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी केली. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी कष्ट घेतले, आणि आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत यात्रा करत आहेत. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास दिला, पोलीस कोठडीत टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत ‘मातोश्री’वर मांडीला मांडी लावून जेवत होतात. दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिकांशी आपण युती केली. शेवटपर्यंत आपल्या मंत्रिमंडळात ठेवलं,” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

“बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्र, देशात नेत आहोत. त्यामुळे खरा अधिकार फक्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील शिलेदारांचा आहे. वसा, वारसा हा फक्त घराण्याचा नसतो, तर तो विचारांचा, तत्वाचादेखील असतो,” असंही ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction naresh mhaske on sanjay raut comment over cm ekanth shinde balasaheb thackeray memorial sgy