अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हल्ला प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षा जाहीर झाल्यापासून भोईर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. जिल्हा रुग्णालयातून त्यांना आता तळोजा कारागृहात हलवण्यात आले.

सन २०१२ मध्ये दिलीप भोईर व त्यांच्या साथीदारांनी चोंढी येथील व्हि टेक कॉम्प्युटर सेंटरवर हल्ला करून काही जणांना मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दिलीप भोईर यांच्यासह २१ आरोपींना अलिबाग न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यापासून दिलीप भोईर यांच्यासह चार आरोपी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र गुरुवारी रात्री त्यांना अचानक या सर्वांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले.

दरम्यान न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिलीप भोईर आवास जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोण आहेत दिलीप भोईर…

दिलीप भोईर हे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आहेत. आदिवासी आणि कोळी समाजात अतिशय लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारणाची सुरवात त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून केली. झिराड ग्रामपंचायत हद्दीत राबविलेल्या विवीध योजना आणि कोव्हिड काळात लोकांना केलेल्या मदततीमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र पक्षात कुचंबणा होत असल्याचे सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपने त्यांच्यावर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाची संघटक पदाची जबाबदारी सोपवली होती. या कालावधीत अलिबाग मतदारसंघात त्यांनी भाजपची संघटनात्मक बांधणी केली होती. मात्र विधानसभा निवडणूकीत उमेदवारी न दिल्याने, त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या निवडणूकीत भोईर यांना ३३ हजार मते मिळाली होती. निवडणूकीनंतर भाजपमध्ये पुन्हा सक्रीय होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र भाजपने त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास नकार दिल्याने, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.