सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमीपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि “सिंधुदुर्ग विकला जात आहे” या आरोपावरून शिवसेनेतच अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या पत्रकार परिषद घेणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत, “आम्ही बाहेरचे म्हणून हिणवणाऱ्यांना मुंबईतील दलालांचा म्होरक्या पाठबळ देत आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
दाभोळी येथील शिरोडकर कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीनंतर परशुराम उपरकर आणि वैभव नाईक यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले. या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शाबासकी देत शेतकऱ्यांशी चर्चाही केली होती., असे त्यांनी सांगितले.मात्र, दरम्यान काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना”बाहेरचे” म्हणून हिणवले. यावर बोलताना उपरकर म्हणाले, “आम्ही जिथे अन्याय होईल, तिथे पोहोचणार.”
जमीन व्यवहारांवरून गंभीर आरोप :
उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांवरून अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “कवडीमोल भावाने जमिनी घेऊन दामदुप्पट दराने विक्री केल्या जात आहेत. ज्यांच्या ताब्यात बँक आहे, त्या बँकेचे कर्ज देखील अशा दलालांना दिले जात आहे. याबाबत आम्ही नाबार्ड आणि न्यायालयात दाद मागणार आहोत.”
पक्षांतर्गत वादाला फोडणी :
माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले येथे येताना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना कल्पना दिली नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगुन श्री. नाईक व श्री.उपरकर यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत टीका केली होती. यावर श्री.उपरकर यांनी शिवसेनेच्या काही जणांनी पत्रकार परिषद घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “पत्रकार परिषद घेण्याऐवजी एकत्र खेळीमेळीत चर्चा झाली असती तर बरं झालं असतं,”असे ते म्हणाले. सावंतवाडीतील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणातही आपण पोलीस ठाण्यात असताना ही मंडळी त्यावेळी काही बोलली नाहीत, असे त्यांनी सांगितले. “वृत्तपत्रात जाण्याऐवजी उद्धव ठाकरेंकडे चर्चा किंवा तक्रार झाली असती तरी हरकत नव्हती. मात्र, मुंबईतील दलालांचा म्होरक्या या ठिकाणी आला आणि या मंडळींना प्रेस घ्यायला भाग पाडले,” असा खळबळजनक आरोप उपरकर यांनी केला.
भूमीपुत्रांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही :
उपरकर यांनी सासोली, पिंगुळी, दाभोळी या भागातील गोरगरीब लोकांना साथ दिल्याचे सांगितले. यापुढेही आपण वैभव नाईक, सतीश सावंत आणि शिवप्रेमींसह सासोली येथे जाणार असून, तेथील स्थानिकांच्या भूमिका जाणून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जो आपला पेशा सोडून जमिनीचा दलाल करत आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चालवत असेल, स्थानिकांवर अन्याय करत असेल, तर आम्ही गप्प बसणारे नाही,” असा इशारा त्यांनी दिला. आमदार, खासदार, पालकमंत्री यांनाही त्यांनी या प्रकरणात साथ दिल्याचा आरोप केला.
“आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे” :
“ज्यांना उद्धव ठाकरेंकडे तक्रार करायची असेल, त्यांनी करावी. मी आणि वैभव नाईक माजी आमदार आहोत. कोणी अन्यायग्रस्ताने हाक मारली तर कुठे जायचे याला मर्यादा नाहीत. आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, जो हाक देईल त्याच्या पाठीशी उभे राहणे हे कर्तव्य आहे,” असे उपरकर यांनी ठामपणे सांगितले.यावेळी आशिष सुभेदार, आदेश सावंत, नाना सावंत, अशोक परब, रमेश शेळके, मनोज कांबळी, संदेश सावंत, मंदार नाईक, सुरेंद्र कोठावळे, शरद हळदणकर आदी उपस्थित होते.