गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता सत्तेत आलेल्या भाजपा-शिंदे गटामध्ये मंत्रीपदं कुणाला किती मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना आता या संकटातून स्वत:ला कशी सावरणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसून राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला असताना अजूनही पक्षासोबत असणाऱ्या नेतेमंडळींनी शिंदे-भाजपा युतीच्या सरकारचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील काही दावे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिंदेंची हौस तात्पुरती भागली”

एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची हौस तात्पुरती भागल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. “हा भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाहीये. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचं जरी नुकसान झालं असलं, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही. महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख हे आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्रात एकट्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करत आहेत”, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

“भाजपानं घटनेचा चोळामोळा करण्याचं पाप केलंय”

महाराष्ट्रातील सत्तानाट्यादरम्यान भाजपानं राज्यघटनेचा चोळामोळा करण्याचं पाप केल्याचं म्हणत राऊत यांनी भाजपाला इशारा दिला आहे. “मी भाजपाला इशारा देतोय, की घोडेबाजारात तुम्ही किती हजार कोटींची उधळपट्टी केली, हे सर्वच लोकांना माहिती झालं आहे. अशा प्रकारे पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील. पण शिवसैनिक विकत घेण्याचा विचार तुम्ही कदापि करू नका. शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील”, असं राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना म्हणते, “…त्या बदल्यात मोदी शिंदे-फडणवीसांकडून मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे करून घेतील”

“उद्धव ठाकरेंसमोर अन्नावर हात ठेवलेले मंत्री…”

“ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच जे लोक मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेले होते, त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाटक सुरू झालं होतं. ५-६ महिन्यांपूर्वीपासून उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं असेल, तर मी खाली उतरतो असं त्यांना सांगितलं होतं. एकनाथ शिंदेंशी वारंवार सविस्तर चर्चा झाली होती. पक्षात फूट पाडण्याचं काम करू नका असं त्यांना सांगितलं होतं. सूरतला ते गेले, त्याच्याही आधी ३ ते ४ वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरेंसोबत अन्नावर हात ठेवून ज्यांनी शपथ घेतली होती, असे काही मंत्री दुसऱ्या तासाला निघून गेले होते”, असा दावा विनायत राऊत यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader vinayak raut slams eknath shinde devendra fadnavis bjp pmw
First published on: 06-07-2022 at 12:06 IST