जळगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला कलह दिवसेंदिवस उग्र होताना दिसू लागला आहे. एकीकडे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंनी स्थानिक शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी देखील एकनाथ खडसेंना आता उघड आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांचा विनयभंग केल्याची ऑडिओ क्लिप एकनाथ खडसेंनी वाजवूनच दाखवावी, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या आरोपांनंतर शिवसेनेने खडसेंविरोधात जळगावमध्ये मोर्चा देखील काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शनिवारी रात्री एका व्हिडीओच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. “काल रात्री साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई यांचा मला फोन आला की काही गावगुंड त्यांच्या घराच्या जवळ जाऊन त्यांचा दरवाजा ठोकत आहेत, त्यांना बाहेर ओढत आहेत. अश्लील शिवीगाळ करत आहेत. त्यांनी विनंती केली की ताई तुम्ही तात्काळ इथे या नाहीतर आम्ही जिवंत राहणार नाही. मी जेव्हा त्यांच्या घराजवळ गेले, तेव्हा ते १० ते १५ लोकं पळून गेले”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. आपण चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचं देखील या लोकांनी सांगितल्याचं रोहिणी खडसेंनी सांगितलं.

यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच ‘त्या’ महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनाच उलट आव्हान दिलं आहे.

“खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय”

“एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. हेच चोर आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला व्यासपीठावर अश्लील बोलल्यामुळे यांच्यावर मुबईत गुन्हा दाखल आहे. त्यांनी एकदा ऑडिओ क्लिप वाजवून दाखवावी. पोलिसांत तक्रार केली तर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? मी माघार घ्यायला लावली असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी सीसीटीव्ही फूटेज दाखवावं, रेकॉर्ड दाखवावं. ३० वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता, पण तुमच्यासारखा खोटा माणूस या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी झाला नाही”, असं पाटील म्हणाले.

“आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”, ‘त्या’ प्रकारावरून रोहिणी खडसेंचा शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप!

“…तर तुम्ही राजकारण सोडाल का?”

“त्या वैयक्तिक दोन लोकांमध्ये झालेल्या मारामाऱ्यांची ती ऑडिओ क्लिप आहे. माझ्याकडे अशी क्लिप आहे की खडसेंच्या कार्यकर्त्याने त्यांच्या नावाने नोकरीसाठी पैसे मागितले. त्यांचा याच्याशी संबंध नसेल हेही मी मान्य करतो. पण असं एखाद्याची तिसरीच ऑडिओ क्लिप असेल आणि त्याचा संबंध तुम्ही आमदारांशी जोडत असाल, तर हा तुमच्या बुद्धीचा मूर्खपणा आहे. माझं त्यांना आव्हान आहे की तुमच्याकडची व्हिडीओ क्लिप दाखवाच. त्याचा चंद्रकांत पाटलांचा काही संबंध असेल, तर मी आत्ताच विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा देईन. नाहीतर तुम्ही राजकारण सोडाल का?”, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla chandrakant patil targets eknath khadse jalgao ncp molestation audio clip pmw