पुण्यातील कसबा आणि पिंपरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेक झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. बुधवारी रात्री विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली असून हल्लेखोराला पोलिसांनी अटकही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोजलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

“महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अनागोंदी चालू आहे. रोज आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच, पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी एका भीतीच्या सावटाखाली आहेत. आदित्य ठाकरेंच्या बाबतीत मराठवाड्यात जो प्रकार घडला, पोलीस कितीही सारवासारव करत असले तरी घटना घडली आहे. त्याच मराठवाड्यात विधानपरिषदेच्या सदस्या प्रज्ञा सातव या महिला आमदारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. असे अनेक प्रकार रोज घडतायत.याचं कारण म्हणजे सरकारचं अस्तित्व दिसत नाही. मंत्रीमंडळ काम करत नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“कदाचित फडणवीसही दिवस काढतायत”

“राज्याचे गृहमंत्री-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा. त्या कार्यकाळाची या कार्यकाळाशी तुलना करावी. तेही बहुतेक दिवस ढकलतायत. पण त्याचा फटका राज्यातल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना बसतोय. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दहशतीखाली आहेत. कारण सगळ्यांची सुरक्षाव्यवस्था गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतली आहे”, अशा शब्दांत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

“…तर त्याचा सगळ्यात मोठा फटका फडणवीसांना बसू शकतो”

“या सरकारचा नक्की डाव तरी काय आहे. मोठं षडयंत्र रचलं जातंय का? विरोधी पक्षांच्या आमदार, नेत्यांवर भविष्यात जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी असा काही कट आहे का? कारण चित्र तसंच दिसतंय. त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागेपुढे पोलीस, सुरक्षारक्षकांचा लवाजमा आहे. त्यांना गरज नाही. पण ज्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे, त्यांच्याविषयी ढिलाईनं काम केलं जातंय. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलली नाहीत, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो”, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.

“हल्ले आणि रक्तपात करून तरी…”

“शिवसेना फोडली, सरकार पाडलं. तरीही आलेलं सरकार नीट चालत नाही. जनमताचा रेटा शिवसेनेच्या, मविआच्या बाजूने आहे. लोकांचे लोंढेच्या लोंढे आमच्या कार्यक्रमांना येत आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद दौऱ्यातही प्रचंड गर्दी उसळते आहे. हे पाहिल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटात गोळा आला. या मार्गाने सत्तेचा गैरवापर जमला नाही. मग अशा प्रकारे हल्ले आणि रक्तपात करून तरी हे थांबवता येईल का, यासाठी हे सगळं सुरू आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut targets devendra fadnavis attack on pradnya satav pmw