सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचे घरपत्रक उतारे देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मळगाव ग्रामपंचायतचे प्रभारी पंचायत विकास (ग्राम विकास) अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण (५२, रा. कणकवली) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहात पकडले. सावंतवाडी शहरातील एका हॉटेलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, प्रकल्प विकासक विजय नाईक यांनी घरांच्या घरपत्रक उताऱ्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. मात्र, गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संबंधित अधिकारी चव्हाण हे या कामात टाळाटाळ करत होते. विकासक विजय नाईक यांनी ग्रामसेवकाशी थेट भेट घेतली असता, त्याने ही कागदपत्रे देण्यासाठी पैशांची मागणी केली. सुरुवातीला त्याने १ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकाने सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.
तडजोडीनंतर लाचेची रक्कम ४० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम देण्यासाठी विकासकाने चव्हाणला फोन केला असता, त्याने सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये भेटायला सांगितले. या माहितीच्या आधारे लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि पैसे स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी चव्हाणला रंगेहात अटक केली. त्यानंतर त्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि विकासकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी, हवालदार श्री. रेवणकर, अजित खंडे, प्रितम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, पोलीस शिपाई स्वाती राऊळ, पो. कॉ. भूषण नाईक, योगेश मुंढे यांनी यशस्वीपणे पार पाडली.