सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणपणे ८० ते १०० हेक्टर क्षेत्रात हळद लागवड केली जाते. बहुतांश लागवड विखुरलेल्या स्वरुपात आहे. सद्यस्थितीत हळद उत्पादनासाठी चांगला वाव असून यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गने जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कुत्रिम बुध्दीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करुन एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातंर्गत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रक्रिया यंत्रणांचा समन्वय साधून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशील शेतीकडे वळविण्याचा उद्देश असल्याचा जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी दिशांत कोळप यांनी कळविले आहे.
हळद लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, संधोधन व प्रक्रियाबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावासाठी हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि. सांगली येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये ५६ हळद उत्पादक शेतकरी तसेच तालुका पातळीवरील कृषी अधिकारी यांनी सहभागी होऊन उत्पादनातील आधुनिक पध्दती, एकात्मिक खत व्यवस्थापन, किडरोग व्यवस्थापन,काढणी पश्चात व्यवस्थापन तसेच प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर माहिती व प्रशिक्षण घेतले आहे. कणकवली, दोडामार्ग आणि वैभववाडी या तीन तालुक्यातील बचत गटांना हळद प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर हळद मुल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हळद काढणी व प्रक्रिया यंत्रे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे मजुरीवरील खर्चात बचत होऊन उत्पादन खर्चात घट होईल. हळदीसाठी भौगोलिक मानांकन (GI) आणि ब्रॅडिंग याबाबत जिल्ह्यात पुढील काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
AI आधारित विश्लेषणाद्वारे हवामान, मातीची गुणवत्ता, योग्य खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण यावर आधारित शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी करुन जिल्ह्यातील हळद लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याचा व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून संकल्प करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी कटिबध्द असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला नवे वळण देण्याचा हा प्रयत्न आहे.
