सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सकाळी सरासरी १३९.८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तिलारी (दोडामार्ग), भगंसाळ (कुडाळ), वागदे (कणकवली) यासह सर्वच नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

कुडाळमध्ये कर्ली नदीला पूर, जनजीवन विस्कळीत बनले आहे तर कुडाळ आंबेडकर नगर मधील १० घरातील ३५ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे कुडाळ परिसरात कर्ली नदीला पूर आला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, गुलमोहर हॉटेलकडे पाणी आल्याने त्या परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. कुडाळमधील आंबेडकर नगरमध्ये पाणी शिरल्याने १० घरातील ३५ लोकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड नदीला पूर आल्याने टाळंबापर्यंतची वाहतूक थांबवण्यात आली होती.

सावंतवाडी, कणकवली, देवगड परिसरातील नद्यांना पूर

जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि देवगड या परिसरातील नद्यांनाही पूर आला आहे. सावंतवाडी तालुक्यात गोवा-बांदा-दाणोली-आंबोली या आंतरराज्य मार्गावर तेरेखोल नदीपात्रातील पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळी नोंदलेली आजची पावसाची आकडेवारी (मिमी मध्ये): देवगड: १०४, मालवण: ६५, सावंतवाडी: १८०, वेंगुर्ला: ११५, कणकवली: २२०, कुडाळ: १७५, वैभववाडी: १२०, दोडामार्ग: १४० एवढी आहे.

आजचा जिल्ह्यातील सरासरी पाऊस १३९.८७ मिमी नोंदवला गेला आहे. पुढील काही तास पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.