Asha Bhosle Speaks on Raj-Udhav Coming Together: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे ती राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची! येत्या ५ जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत एका मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. पण त्याहीपुढे ते राजकारणात कायमस्वरूपी एकत्र येतील का? किंवा त्यांच्यात युती होईल का? यावर तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रतिक्रिया आली आहे. आपल्याला राजकारणात फक्त आशिष शेलारच माहिती आहेत, असं आशा भोसलो म्हणाल्या आहेत.

आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्ताने आशा भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आर. डी. बर्मन, लता मंगेशकर, अशोक कुमार आदी अनेक दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला. मंगेशकर कुटुंबीयांचे ठाकरे कुटुंबाशी आपुलकीचे संबंध असल्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात आशा भोसले यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

मला राजकारण नकोच आहे – आशा भोसले

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, त्याबद्दल नेमकी काय भूमिका आहे? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली असता त्यावर आशा भोसलेंनी आपल्याला राजकारण नको असल्याचं सांगितलं. “मला राजकारणातले फक्त आशिष शेलार माहिती आहेत. इतर कुठलेही लोक माहिती नाही. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला हे राजकारण नकोच आहे”, असं आशा भोसले म्हणाल्या.

का होतेय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा?

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली असून त्यासाठी या दोन्ही नेत्यांकडून केली जाणारी विधानंही कारणीभूत ठरली आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंनी ‘जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल’ असं सूचक विधान शिवसेनेच्या वर्धापन मेळाव्यात केलं. राज ठाकरेंनीदेखील ‘महाराष्ट्राच्या हितापुढे काहीही मोठं नाही, ५ जुलैला कळेल’, असं विधान केलं. त्यामुळे फक्त हा मोर्चाच नव्हे, तर राजकीयदृष्ट्यादेखील हे दोघे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय वर्तुळातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया…

दरम्यान, राज व उद्धव ठाकरे एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घडामोड मानली जात आहे. इतर पक्षीयांकडून याबाबत सावध भूमिका मांडल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया युती होणार असल्याचं सूचित करत आहेत. “राज व उद्धव ठाकरे हे मनाने एकत्र आलेलेच आहेत”, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केलं.

या एकत्र मोर्चाबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “या सरकारला मराठी माणसाची ताकद दिसणं आवश्यक आहे. महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती केली जात आहे. महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत असेल तर आपण सर्वांनी सरकारच्या अंगावर जाणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी तशी भूमिका मांडली आणि आम्ही त्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात एकच मोठा मोर्चा निघावा असं राज यांनी म्हटलं आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे आहोत.”