पंढरपूर : भीमा आणि नीरा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. तसेच उजनी धरण १०० टक्के भरले असल्याने धरणातून १ लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यंदा पावसाळी हंगामात पाच वेळा भीमा नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. सध्यादेखील भीमा नदीला पुराचे संकट दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा परिणाम उजनी धरण आणि भीमा नदीला बसत आहे. पुण्यातील धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत होता. उजनी धरण १०० टक्के भरले आहे. तसेच उजनी धरण क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उजनी धरणातून रविवारी रात्रीपासून भीमा नदीला पाण्याचा विसर्ग सुरू केला. सुरुवातील पाच हजार क्युसेक पाणी सोडले. पुढे वाढत दुपारी एक लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना उजनी धरण व्यवस्थापनाने इशारा दिला आहे.
त्याच बरोबरीने वीर धरणातून देखील नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी वीर धरणातून ७८३७ क्युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी अकलूजजवळ असलेल्या संगम येथे भीमा नदीला येऊन मिसळते. हे पाणी पुढे भीमा अर्थात चंद्रभागा नदीला मिळते. त्यामुळे भीमा नदी पुन्हा दुथडी भरून वाहिली जाईल. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुपारी पंढरपुरातील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी ४५३ मीटर इतकी आहे, तर नदीतून ८९०० क्युसेक पाणी वाहत आहे. नदीची इशारा पातळी ४५८ मीटर आहे. मात्र, उजनी आणि वीर धरणातून येणारे पाणी पाहता पुराचे संकट आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.