सोलापूर : भाजपचा सोलापुरातील बालेकिल्ला काबीज करताना काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा आणि मोहोळ भागातील मराठा आरक्षण आंदोलन आणि शेतक-यांची सरकारविरोधी नाराजी हे घटक आधार देणारे ठरले. यात भर म्हणून मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजपविरोधी झालेली मोठी मतविभागणी यंदा टळली. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तथापि, भाजपचा बालेकिल्ला सर करताना प्रणिती शिंदे स्वतः यापूर्वी सलग तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात त्यांना अवघ्या ७९६ मतांची आघाडी घेता आली. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसला बरीच मोठी मेहनत करावी लागणार आहे.

हेही वाचा : “अतिआत्मविश्वासाचा आम्हाला फटका बसला”, संजय शिरसाटांचं विधान चर्चेत; म्हणाले, “जागावाटपात झालेल्या सर्व्हेमुळे…”

यंदाच्या निवडणुकीत एकूण १२ लाख ४६११ मतांपैकी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी सहा लाख २० हजार २२५ (५१.४८ टक्के) मते मिळवून ८० हजार २९७ मताधिक्याने विजय खेचून आणला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे राम सातपुते यांच्या पारड्यात पाच लाख ४६ हजार २८ ४५.५२ टक्के) मते पडली.

हेही वाचा : लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”

या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या अपरोक्ष उमेदवारी मागे घेऊन थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अपक्ष अतिश बनसोडे यांना पुरस्कृत केले असता मतमोजणीत बनसोडे यांना अवघी दहा हजार ५०७ मते (०.८७ टक्के) मिळू शकली. बसपाचे बबलू गायकवाड यांनाही जेमतेम ५२६८ माते मिळाली. बनसोडे व गायकवाड यांच्यासह १९ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. २७२५ मतदारांनी नोटाचे बटन दाबून नकारात्मक मतदान केल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur lok sabha result 2024 congress praniti shinde win with maratha and farmers voting css