सोलापूर : सोलापूर आणि माढा दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई होत असून त्यासाठी उद्या मंगळवारी दोन्ही जागांवर मिळून ४० लाख २१ हजार ५७३ मतदार उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद करणार आहेत. तापमानाचा पारा तब्बल ४४ अंशांवर असताना मतदानाची टक्केवारी वाढणार की घटणार, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता आहे. मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसह बलाढ्य उमेदवारांसमोर उभे आहे.

सोलापुरात भाजपचे राम सातपुते व काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासह बसपाचे बबलू गायकवाड, वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आदी एकूण २१ उमेदवार रिंगणात असून तुल्यबळ लढत राम सातपुते व प्रणिती शिंदे यांच्यात होत आहे. त्यांचे भवितव्य २० लाख ३० हजार ११९ मतदारांच्या हाती आहे. प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी गुप्त राजकीय हालचाली वाढल्या असून मतदारांना आपापल्या बाजूने वळविण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न होत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे मतदार वळू नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या जात आहेत. रात्री काही भागात ‘थैलीशाही’सह जातींची गणिते महत्वाची मानली गेली, अशी चर्चा होती. सोलापुरात शहरी आणि ग्रामीण भागात तुल्यबळ उमेदवारांची यंत्रणा भूमिगत होऊन कार्यरत होती.

हेही वाचा – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दिलासा; दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर

तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असताना मतदारांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रांभोवती सावलीच्या व्यवस्थेसह पिण्याचे पाणी, उष्माघातापासून बचावासाठी गरजेनुसार ओआरएसयुक्त पाणीपुरवठा, स्वतंत्र स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध केल्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. एकूण १९६८ मतदान केंद्रे असून संवेदनशील मतदान केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस, गृह रक्षक दलाची कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नजर राहणार आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एकूण चार गुन्हे नोंद असून त्यात करमाळा येथे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी पैसे वाटपाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात संशयास्पदरीत्या रोख रक्कम नेताना झालेल्या कारवाईत एकूण २९ लाख ७५ हजार ७८० रुपयांची रोकड जप्त झाली आहे. तर अवैध दारूची तस्करी पकडताना एक कोटी ८० लाख रुपये किंमतीची दारू जप्त झाली आहे.

हेही वाचा – विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे संतापले; म्हणाले, “त्यांचं डोकं फिरलंय…”

माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर अणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत होत असून वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर व बसपाचे स्वरूप जानकर, अपक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह ३२ उमेदवार भवितव्य अजमावत आहेत. त्यासाठी एकूण १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.