सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यावर पुन्हा पडत असलेल्या जोरदार पावसामुळे इकडे उजनी धरणातील पाणीसाठा पन्नाशीकडे वाटचाल करीत आहे. शनिवारी सकाळपर्यंत धरणात होणाऱ्या पाण्याची आवक वाढवून १५ हजार ६८२ क्युसेकपर्यंत नेण्यात आली होती. धरणात प्रथमच पुण्यातील बंडगार्डन येथून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

यासंदर्भात जल संपदा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी धरणात एकूण ८५.४९ टीएमसी इतका पाणीसाठा होता. तर उपयुक्त पाणीसाठा २१.८३ टीएमसी एवढा होता. त्याची टक्केवारी ४०.७४ होती. सायंकाळपर्यंत धरणात पाण्याची आवक वाढतच होती. त्यामुळे येत्या चार दिवसांत धरण ५० टक्के भरण्याची अपेक्षा आहे.

गेल्या ११ जून रोजी धरणात एकूण पाणीसाठा ८३.४३ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा १९.७७ टीएमसी (३६.०२ टक्के) होता. दौंड येथून धरणात येणारी पाण्याची आवक तुलनेने कमी म्हणजे ३७०२ क्युसेक इतकी होती. तीन दिवसांत प्रमाणातील पाणीसाठा दोन टीएमसीने वाढल्याचे दिसून येते. यात दौंड येथून येणाऱ्या पाण्याची आवक पुन्हा वाढून १५ हजार ६८२ क्युसेक झाल्यामुळे धरण वेगाने भरण्यास मदत होत आहे.

गेल्या मे महिन्यात इतिहासात प्रथमच धरण मृत पातळीतून उपयुक्त पातळीत आले होते. मे महिन्यात वजा २२.९६ टक्क्यांवरून उपयुक्त २५ टक्क्यांपर्यंत धरण भरले होते. त्यानंतर अलीकडे काही दिवसांत धरणात. येणाऱ्या पाण्याची आवक घटल्याने धरण संथगतीने भरत होते. परंतु आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने धरण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ५० टक्क्यांपर्यंत भरण्याची चिन्हे दिसत आहेत.