अहिल्यानगर : श्रीरामपूर शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांकडून ३ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, ६ मॅगेझिन, २ मोबाईल व मोटार असा ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोधमोहिमेत १० गावठी कट्टे यापूर्वी जप्त करण्यात आले होते.बबलू ऊर्फ इम्तियाज अजित शहा (वय ३५, रा. बाबापुरा चौक, श्रीरामपूर), नदीमखान साबीरखान (वय ३०, चाळीसगाव, जळगाव), ऋतुराज बाळासाहेब दाणी व नंदकिशोर संजय शिरसाट (दोघे रा. श्रीरामपूर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. बबलू शहा व नदीमखान या दोघांनी गावठी कट्टे विक्रीसाठी आणले होते. त्यासाठी ऋतुराज दाणी व नंदकिशोर शिरसाठ यांनी खरेदीसाठी आगाऊ रक्कम दिली होती. एकूण १ लाख २० हजार रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता, असेही सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचे पथक तसेच श्रीरामपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई आज, बुधवारी श्रीरामपूर मधील संजयनगर रस्त्यावरील मिल्लतनगर येथे सापळा लावून केली. ईर्टीगा मोटारीमध्ये डॅशबोर्ड व सीटखाली ही शस्त्रे दडवण्यात आली होती. दाणी हा मोटर विक्रीचा व्यवसाय करतो तर शिरसाट हा शेतकरी आहे. बबलू शहा याच्यावर खून, खंडणी, दरोडे, शस्त्र प्रतिबंध आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर नदीमखान याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाण, शस्त्र प्रतिबंधक गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक रोशन निकम, गणेश जाधव, दादा मगरे, अंमलदार रवींद्र चव्हाण, सचिन धनाड, संतोष दरेकर, काका मोरे, अनिल शिंगाडे, रामेश्वर वेताळ, सतीश पठारे यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला.
६५ गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव
पत्रकार परिषदेत माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६५ गुन्हेगारांविरुद्ध ५८ तडीपारचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यामध्ये राहुरी, अकोले, शिर्डी येथील ३ टोळ्यांचा समावेश आहे. श्रीरामपूर शहरातून १३ व तालुक्यातून १, राहुरी ९, नेवासे ५, सोनई १, कोपरगाव शहर ५ व तालुका २, शिर्डी ३, राहता ३, लोणी १, संगमनेर १०, अकोले ३ व घारगाव २ अशा प्रस्तावांचा त्यामध्ये समावेश आहे.