Sthanik Swarajya Sanstha Nivadnuk Candidate Expense Limit: राज्यात आरक्षणाच्या मुद्यांवरून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यातील २४६ नगरपरिषदांचा आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे.
आज पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आल्याचेही स्पष्ट केले. राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माहितीनुसार, या निवडणुकीत अ वर्ग नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख व सदस्यपदासाठी ५ लाखांची खर्चमर्यादा ठेवण्यात आली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी हीच मर्यादा अनुक्रमे ११ लाख २५ हजार आणि ३ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे. तर, क वर्गासाठी हीच मर्यादा अनुक्रमे ७ लाख ५० हजार व २ लाख ५० हजार ठरवण्यात आली आहे.
याशिवाय, नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
ईव्हीएमवरच होणार मतदान
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, “नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भातील मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. तर, मतदार केंद्र निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत. निगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी एकणू १ कोटी ३ हजार ५७६ मतदार आहेत. यासाठी एकूण १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएम ची व्यवस्था करण्यात आली असून, या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ईव्हीएम द्वारेच होणार आहे.”
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- अर्ज दाखल करण्यास सुरुवात: १० नोव्हेंबर २०२५
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२५
- अर्जांची छाननी: १८ नोव्हेंबर २०२५
- अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत: २१ नोव्हेंबर २०२५
- आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत: २५ नोव्हेंबर २०२५
- निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी: २६ नोव्हेंबर २०२५
- मतदान: २ डिसेंबर २०२५
- मतमोजणी: ३ डिसेंबर २०२५
- निकाल जाहीर करण्याचा दिवस: १० डिसेंबर २०२५
