सांगली : दीपावलीतील महत्त्वाचे समजले जाणारे लक्ष्मी-कुबेर पूजन मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळपासूनच शहरातील रस्ते आतषबाजी, रोषणाईसह नागरिकांच्या अपूर्व उत्साहात उजळले. तर या दिवळातील मुख्य सणासाठीच्या खरेदीपासून ते मुहूर्तावरील खरेदीसाठी जागोजागीचे बाजार फुलले.
खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी सांगली, मिरज शहरात झाली होती. सायंकाळनंतर दुकाने, व्यावसायिक आस्थापनामध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले. तर बुधवारी असलेल्या दिवाळी पाडव्या निमित्त ग्राहकांच्या स्वागतासाठी वाहन, संगणकसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने सजविण्यात आली आहेत.सोमवारी नरक चतुर्दशी दिवशीच अमावस्या असल्याने काहींनी कालच लक्ष्मीपूजन केले. मात्र, कार्तिक प्रतिपद आज सायंकाळपासून सुरू होत असल्याने पाडवा आणि अमावस्या असा मुहूर्त पाहून अनेक घरांत व व्यावसायिकांनी आज लक्ष्मीपूजन केले. सायंकाळी लक्ष्मी पूजेवेळी शहरात मोठ्या प्रमाणात आताषबाजी सुरू होती.
दरम्यान, लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी सांगलीमध्ये हरभट रोड, मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, कापड पेठ, दत्त-मारुती रस्ता, विश्रामबागमध्ये गणेश मंदिर, शंभर फुटी रस्ता या ठिकाणी विक्रेत्यांनी ठेले मांडले होते. पूजनासाठी लागणारी झेंडू फुले, फळे, कमळाचे फूल, केरसुणी, नागवेलीची पाने, नारळाच्या झावळ्या, उस यासह रांगोळी, उदबत्ती, कापूर, हार, साळी पोहे, धने, चिरमुरे, बत्तासे आदी विक्रीचे स्टॉल मांडण्यात आले होते.
झेंडू फुलांचा सकाळी दर १०० रुपये किलोपर्यंत होता. दुपारनंतर यामध्ये घट झाल्याचे दिसून आले. तरीही ६० रुपये दराने फुलांची खरेदी-विक्री होत होती. याशिवाय दुकान व घरात आढ्याला बांधून ठेवण्यासाठी कोहळ्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. प्रति नग शंभर रुपयांपर्यंत या कोहळ्याचे दर होते.याशिवाय कापड दुकानांतही मोठी गर्दी आजही होती. तयार कपडे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून, तयार कपड्यांच्या दुकानात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
मिरज शहरात लक्ष्मीपूजेचे साहित्य विक्रीसाठी महाराणा प्रताप चौक ते सराफ कट्टा हा मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तांदूळ मार्केटमार्गे एकेरी वाहतूक ठेवण्यात आल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी वारंवार होत होती. याच मार्गावर विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक कोंडीचा सामना पायी जाणाऱ्यांनाही होत होता.मिरज व सांगली शहरात मोठ्या थाटात लक्ष्मीपूजन करण्यात आले. भटजी व जंगम यांच्या हस्ते सूर्यास्तानंतर लक्ष्मी पूजनाची धांदल उडाली होती. याच वेळी घरातील लक्ष्मी व कुबेर पूजनाबरोबरच व्यापारी दुकाने, आस्थापने या ठिकाणी पानसुपारीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली बाजार समितीमध्येही दिवसभर लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत लक्ष्मी पूजेनिमित्त आतषबाजी सुरू होती.
दरम्यान, वस्तू व सेवा करात कपात झाल्यानंतर वाहन उद्योगाला चालना मिळाली असून, कमी झालेल्या दरात उद्या दिवाळी पाडव्या दिवशी वाहन खरेदीचा अनेकांचा मानस आहे. हे ओळखून दुचाकी व चारचाकी वाहनांचे शोरूम विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहेत. उद्या दुचाकीची खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांनी आठ दिवसांपूर्वीच नोंदणी केली असल्याचे सिद्धिविनायकचे व्यवस्थापक श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले.