|| प्रदीप नणंदकर

सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात आलेल्या पुराने, तर मराठवाडा, खानदेश, नगर व सोलापूर या भागात झालेल्या अल्प पावसामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून त्यामुळे यावर्षी साखरेच्या उत्पादनात ५० टक्के घट होईल, असा अंदाज खासगी साखर कारखाना संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्हय़ांतील उसाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीचे पथक ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही जिल्हय़ांत जाऊन आले. त्यांच्यासमवेत पांडुरंग राऊत, महेश देशमुख, अजित चौगुले, शिवाजीराव देशमुख, विकास देशमुख यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे पदाधिकारी, डेक्कन शुगर इन्स्टिटय़ूटचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

राज्यातील एकूण साखरेच्या उत्पादनापकी ४० टक्के साखरेचे उत्पादन मराठवाडा, नगर, सोलापूर व खानदेशात होते. यावर्षी या भागात भीषण दुष्काळ असल्यामुळे या भागातील उत्पादनाला ७५ टक्के फटका बसणार आहे. उर्वरित ६० टक्के उत्पादनांपकी ४० टक्के उत्पादन कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्हय़ांत होते, तर उर्वरित २० टक्के, पुणे, नाशिक या भागात होते. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्हय़ांत दोन लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीचे नुकसान झाले, त्यापकी ८० टक्के क्षेत्रावर केवळ ऊस होता. ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक ऊस शेंडय़ापर्यंत पाणी आठ दिवस राहिल्याने पूर्ण कुजून गेला. त्यामुळे या उसाचे १०० टक्के नुकसान झाले. शेंडा शिल्लक राहून उर्वरित ऊस पाण्यात राहिलेले क्षेत्रही मोठे आहे. अशा उसाच्या उत्पादनात २५ टक्के घट होईल व ज्या उसात गुडघाभर पाणी राहिले त्याच्या उत्पादनात १० टक्के घट होईल. गतवर्षी राज्यभरात एकूण १०५ लाख टन इतके साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी दुष्काळामुळे ५० टक्के घट होईल. ते ५३ ते ५५ लाख टन इतकेच होईल, असे ठोंबरे म्हणाले.

शासनाने पूरग्रस्त भागात ज्यांचे १०० टक्के उसाचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार, तर ५० टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्यावी. या भागातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचा आहे त्या स्थितीतील ऊस गाळपासाठी न्यावा लागणार आहे. साखर उताऱ्यात मोठी घट होणार असल्यामुळे या भागातील साखर कारखान्यांना प्रतिटन ५०० रुपये साखर उतारा घट अनुदान शासनाने द्यावे. केंद्र शासन दरवर्षी गतवर्षी जो साखर उतारा होता त्यावर आधारित पुढील वर्षांसाठी उसाच्या एफआरपीची किंमत ठरवते. यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांचा जो साखर उतारा येईल त्यावर एफआरपीची किंमत ठरवली जावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याचे ते म्हणाले.