संगमनेर : थोरात सहकारी साखर कारखाना यावर्षी गाळप ऊसाला प्रतिटन ३२०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरसकट संपूर्ण कर्जमाफी लगेच करावी, पंजाब सरकारप्रमाणे प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, कांचन थोरात, दुर्गा तांबे, पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, थोरात कारखाना काटकसर, अचूकता व पारदर्शक निर्णय घेत वाटचाल करत आहे. कारखान्याने १५ लाख मे. टनापर्यंत गाळप करून क्षमता सिद्ध केली. आगामी काळामध्ये कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.
संगमनेर तालुक्याला काही लोक बदनाम करत असून, खोट्या केसेस केल्या जात आहेत. बाहेरच्या संदेशावर ते काम करत आहेत. तालुक्याच्या विकासासाठी आपल्यातील मतभेद दूर करावे लागणार आहेत. आपण धार्मिक आहोत, हिंदूधर्मीय आहोत परंतु आपण इतर धर्माचा द्वेष करत नाही. सर्वांनी तालुक्याची वाटचाल जपण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला मात्र मराठवाड्यासह काही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली.
शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडून शेतीचेही मोठे नुकसान झाले. अशा काळामध्ये पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली.
डॉ. तांबे म्हणाले की, माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे दिशादर्शक काम सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर हा कारखाना चालू आहे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत कारवाई करणार असल्याचे म्हटले, हे अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे. यामधून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याने त्यांचे अभिनंदन, असे माजी मंत्री थोरात म्हणाले.