शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीडमधील महाप्रबोधन सभेत भाजपावर सडकून टीका केली. भाजपा वेगवेगळ्या नेत्यांचा वापर करून नंतर त्यांना सोडून देतं, असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला. यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांचं उदाहरण दिलं. तसेच सदाभाऊंना फोन केल्यावर काय झालं याचा किस्सा भरसभेत सांगितला. त्या शनिवारी (२० मे) बीड जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या ग्रामीण भागातील समारोपीय सभेत बोलत होत्या. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “शिवसेनेला महाविकास आघाडीत काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. बीड जिल्हा म्हटला की, ऊसतोड मजुरांचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. त्यापाठोपाठ भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आठवतात. गोपीनाथ मुंडे होते तेव्हा शिवसेना-भाजपाची युती होती. परंतु आता गोपीनाथ मुंडे नाहीत. त्यामुळे युती राहिली नाही. त्याचबरोबर नैतिकता पाळणारी भाजपाही राहिली नाही.”

“त्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले”

“भारतीय जनता पार्टीत आता शब्दांची पलटी करणारे बेईमान लोक आहेत. हे लोक कळसुत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. परंतु वाईट याचं वाटतं की या त्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकले आहेत. या भारतीय जनता पार्टीने केवळ लोकांचा वापर करून घेतला आहे. वापर करून झाल्यावर त्या लोकांना भाजपाने वाऱ्यावर सोडलं,” असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.

हेही वाचा : VIDEO: जिल्हाध्यक्षांकडून दोन चापट्या मारल्याचा दावा, सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काल तो माणूस…”

“विनायक मेटेंचा वापर करून घेतला”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “भाजपाने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचा वापर करून घेतला. परंतु मेटेसाहेबांनंतर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. ही भाजपाची नीती आहे. त्यांनी महादेव जानकरांचा वापर करून घेतला. त्यानंतर त्यांची उपयुक्तता संपल्यावर त्यांनाही साईडलाईन केलं.”

“सदाभाऊ म्हणाले की, भाजपाने आपलं करण्यासारखं काय ठेवलं”

“त्यानंतर भाजपाने सदाभाऊ खोतांचा वापर केला. आता सदाभाऊ कुठे आहेत. मी सकाळी सदाभाऊंना फोन केला आणि म्हटलं की, मला तुमची सहज आठवण आली. विनायक मेटे नाहीत, महादेव जानकरांना बाजूला टाकलं आहे. बीडमधील सभा आहे, तुम्ही कुठे आहात. सदाभाऊ म्हणाले की, भाजपाने आपलं करण्यासारखं काय ठेवलं आहे. आता म्हशीच्या धारा काढायच्या दुसरं आपल्याला काय काम आहे,” असा किस्सा सुषमा अंधारेंनी भरसभेत सांगितला.

व्हिडीओ पाहा :

“ते ४० लोक अजूनही मला भावंडं वाटतात, कारण…”

“सदाभाऊ खोतांसारखा धडपड करणारा एवढा चांगला शेतकऱ्यांचा नेता, पण त्यांनाही भाजपाने वापरून सोडून दिलं. भाजपा अनेकांना वापरते आणि सोडून देते. यावेळी भाजपाकडे वापरण्यासाठी आमच्याकडून गेलेली आमची ४० भावंडं आहेत. ते अजूनही मला भावंडं वाटतात, कारण कुठल्याही कुटुंबातील लेक-माता म्हणून कुटुंब सावरलं पाहिजे, कुटुंब जोडलं पाहिजे. त्यांच्या कितीही चुका झाल्या तरी हे केलं पाहिजे,” असंही अंधारेंनी नमूद केलं.