अलिबाग : संशयित पाकीस्‍तानी बोट म्‍हणून सर्व सुरक्षा यंत्रणांची झोप उडवणारी ती वस्‍तू अखेर पोलीसांच्‍या हाती लागली आहे. रेवदंडाजवळ बाजारपाडा समुद्रकिनाऱ्यावरून पाकिस्तानी बोया पोलिसांनी हस्तगत केला आहे.

भारतीय संरक्षण दलाच्या रडारवर पाकिस्तानी संशयास्पदरित्या कोर्लई येथील समुद्र किनाऱ्यावर दिसून आली होती. मकदार ९९ नामक या बोटीच्या कोर्लई जवळील लोकेशन मुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. तपासणी नंतर ती बोट नसून जिपीएस प्रणाली असलेला बोया असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले होते. मात्र रडारवर दिसणारा हा बोया सुरक्षा यंत्रणांना सापडत नव्हता.

रायगड पोलीसांकडून या पाकीस्तानी बोयाचा कसून शोध सुरू होता. चार दिवस रेवदंडा, कोर्लई, थेरोंडा या गावांमध्ये बोयाचा दिवसरात्र शोध सुरू होता. अखेर तो बोया पोलीसांना बंदरपाडा येथील समुद्र किनाऱ्यावर आढळून आला. जिपीएस आणि एआयएस ट्रान्सपॉन्डर बसवेला हा बोया सौर उर्जेवर चार्ज होत होता. त्यानंतर तो रडार यंत्रणांना दिसत होता. मात्र चार्जिंग उतरली की रडारवरून दिसेनासा होत होता.

बाजारपाडा किनारी नजरेस संशयास्पद वस्तू आढळली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती पोलीसांना मिळाल्‍यानंतर पोलीसांचे पथक दाखल झाले. सर्व शहानिशा करून रेवदंडा पोलीसांनी पंचनामा करून ती ताब्‍यात घेतली. रायगडच्‍या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

मुरूड तालुक्‍यातील कोर्लई किनारी पाकीस्‍तानची संशयित बोट असल्‍याचा संदेश तटरक्षक दलाच्‍या दिल्‍ली कार्यालयातून रायगड पोलीसांना मिळाला. त्‍यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणाची धावपळ उडाली. सर्वत्र नाकाबंदी करण्‍यात आली. पोलीस, तटरक्षक दल, नौदल यांचया माध्‍यमातून या संशयित बोटीचा शोध सुरू झाला. सर्वत्र नाकाबंदी करण्‍यात आली.

वाहनांची हॉटेल्‍सची झाडाझडती सुरू झाली होती. अखेर ही बोट नसून जीपीआरएस बसवलेला पाकीस्‍तानी बोया असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. परंतु ती वस्‍तु यंत्रणांच्‍या हाती लागली नव्‍हती. ती सापडल्‍याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.