किशोरी पेडणेकर, राजन साळवी तसंच ठाकरे गटातल्या इतर नेत्यांवर जी काही कारवाई केली जाते आहे ती कारवाई चुकीची आहे असं म्हणत असताना नाशिकमध्ये आज संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. रामाची पूजा करायची आणि राज्य रावणाचं चालवायचं असं सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि अयोध्येचा तसंच बाळासाहेब ठाकरेंचा काही संबंध नाही असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“रामाची पूजा करायची आणि रावणाचं राज्य चालवायचं त्या पद्धतीने चाललं आहे. भाजपाची रामाची पूजा हे ढोंग आहे. राम सत्यवचनी होता. जर ते सत्यवचनी असते तर ते जसे आत्ता वागत आहेत तसे वागले नसते. जनता न्यायालयात या सगळ्यांचे मुखवटे ओरबाडून काढल्यानंतर त्यांचा तिळपापड झाला. त्यामुळे आमच्या लोकांवर कारवाया करणं, धाडी घालणं हे सुरु केलं. सूरज चव्हाण यांना अटक झाली. किशोरी पेडणेकरांना समन्स आला आहे. बडगुजर यांच्या मागे ससेमिरा लावला आहे. हे सगळं त्यामुळेच चाललं आहे. ” असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे गट आणि बाळासाहेबांचा काय संबंध?
नाशिकमध्ये शिंदे गटाकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत त्याबाबत विचारलं असता, शिंदे गटाचा आणि बाळासाहेबांचा संबंध काय? शिंदे गटाचा बाळासाहेब ठाकरेंशी दुरान्वये संबंध नाही. अयोध्येशी काही संबंध नाही. हे सगळे जे आहेत ते रामायणातली पात्रं नक्की आहेत ज्यांचा रामाने वध केला. असं म्हणत शिंदे गटालाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
२२ आणि २३ तारखेला शिवसेनेचा धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव महाराष्ट्राला दिशा देणारे ठरतील. २२ जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकला आले की आधी भगूरला जातील. वीर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले त्यांनी रोड शो केला. पण त्यांना वीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली नाही. उद्धव ठाकरे तसे नाहीत. त्यांना वीर सावरकरांचं विस्मरण झालेलं नाही. त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काळा राम मंदिरात उद्धव ठाकरे दर्शन घेतील. त्यानंतर २३ जानेवारीला सकाळी जो बाळासाहेब ठाकरेंचा जन्म दिवस आहे त्यादिवशी सकाळी राज्यव्यापी अधिवेशनाची सुरुवात होईल अशी माहिती संजय राऊत यांनी म्हटलं आहे.