सोलापूर : विधानसभा निवडणुकीत सोलापुरात एकमेकांच्या विरोधात भूमिका घेऊन, प्रसंगी आंदोलन- प्रतिआंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विरोधातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा राग अजून शांत झाला नाही. यातूनच आगामी सोलापूर महापालिका निवडणूक काँग्रेससोबत न जाता स्वबळावर लढविण्याची मानसिकता शिवसेना ठाकरे पक्षाने बाळगली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुंबईत मातोश्रीवर घेतला जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदार संघात शिवसेना ठाकरे पक्षाने दिलेले उमेदवार अमर रविकांत पाटील यांच्या प्रचारात न उतरता काँग्रेसने अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप डावलून समर्थन केले होते. एवढेच नव्हे तर निवडणूक प्रचारात स्वतः ठाकरे यांनी सोलापुरात येऊन खासदार प्रणिती शिंदे यांची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली होती. परंतु तरीही काँग्रेसने शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मदत केली नव्हती. त्यामुळे शिवसैनिकांनी चिडून सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमांना जोडे मारून आंदोलन केले होते. खासदार प्रणिती शिंदे यांची मोटार फोडण्याचा इशाराही शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी दिला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेना नेत्यांच्या छबीची गाढवावरून धिंड काढली होती. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बांगडी आंदोलन केले होते. या आंदोलन-प्रतिआंदोलनामुळे महाविकास आघाडीमधील तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले होते. यातच दुसरीकडे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे पक्षाचे बहुतेक पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले नव्हते, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा >>>Anna Hazare : “अण्णा हजारे आजारी असतील, भाजपाची सत्ता आल्याने…”, रोहित पवारांची खोचक टीका

या पार्श्वभूमीवर सोलापुरात महाविकास आघाडीतील वाढलेल्या लाथाळ्या आजही चर्चेत आहेत. त्याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकदिलाने एकत्र येण्याची शक्यता धुसर दिसते. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या सोबत न जाण्याची मानसिकता शिवसेना ठाकरे पक्षाने बाळगली आहे. स्वबळावर लढण्याचा मानस शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

हेही वाचा >>>Eknath Shinde in Village : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? शिंदेंच्या आमदाराच्या सूचक विधानाने खळबळ; म्हणाले, “ते गावी गेले की…”

शिंदेंची दगाबाजी लक्षात ठेवणार

लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली होती. परंतु त्याची जाणीव न ठेवता खासदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधात भूमिका घेतली. स्वतः ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांची कानउघाडणी करूनही शिवसेनेशी दगाबाजी करण्यात आली. ही दगाबाजी आम्ही कधीही विसरू शकत नाही, असे शिवसेना ठाकरे पक्षाचे सोलापूर लोकसभा समन्वयक, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी स्पष्टपणे सांगितले