कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभरासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय उसतोड बंद आंदोलनाची सुरुवात होत असतानाच बुधवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कराडजवळ पेटवून देण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उसाला एफआरपी अधिक किमान साडेतीनशे रुपये उसदर जाहीर करावा. संपूर्ण एफआरपी पहिली उचल म्हणून तर उर्वरित साडेतीनशे रूपये त्यानंतर देण्यात यावे या आपल्या मागणीकडे राज्यकर्ते व साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी “स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गुरुवारी (दि. १७) व उद्या शुक्रवारी (दि. १८) या दोन दिवसात राज्यभर उसतोड बंद ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. तर, कोणत्याही परिस्थितीत ऊस वाहतूक होऊ नये असा इशारा शेट्टींनी साखर कारखानदारांना व ऊस वाहतुकदारांना दिला होता. या आंदोलनाला बुधवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. तर, रात्री उशिराच्या सुमारास कराड तालुक्यातील इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात ७ – ८नी लोकांनी पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: “राहुल गांधींना अटक करा!”; मुंबईत शिवाजी पार्क पोलीसांना रणजित सावरकरांचं पत्र

ट्रॅक्टरचा काही भाग जळाला असून, या घटनेमुळे उसतोड व ऊसवाहतूक बंद आंदोलनाला जणू बळ मिळाले आहे. हा ऊस वनवासमाची (ता. कराड) येथून धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सकडे वाहतूक होत होता. या ट्रॅक्टरला आग लावल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना उंब्रज (ता. कराड) पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये भर कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

साताऱ्यात रास्त उसदरासाठी खदखद
कोल्हापूर या शेजारच्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्याइतकाच साखरेचा उतारा असताना कोल्हापूरमधील साखर कारखान्यांनी ३,२०० रुपयांप्रमाणे प्रतिटन उसाची पहिली उचल जाहीर केली आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे रास्त ऊसदरासाठी विशेषतः ग्रामीण जनतेत खदखद दिसते आहे. एफआरपी अधिक साडेतीनशे रुपये असा उसदर जाहीर करावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. तर, अशाच मागणीसाठी उसदर संघर्ष समितीची स्थापना होवून त्या माध्यमातून शेतकरी व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. त्यांच्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलने सुरु आहेत. स्वाभिमानीचा उसतोड बंदीचा इशारा आणि ऊस संघर्ष समितीच्या माध्यमातून दिसणारी आंदोलकांची एकजूट पाहता साताऱ्यात उसदराचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The burning of tractors for sugarcane price momvment swabhimani shetkari sanghtna frp karad satara tmb 01