महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलं आहे त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करु नये असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे. अहमदनगरचं अहिल्या नगर असं नामांतर होणार असेल तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. पण महाराष्ट्र भवनातून पुतळे हटवल्यानंतर ही भूमिका सरकारने घेतली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलं आहे

“महाराष्ट्रात सध्या सरकार आहे का? आमच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता, शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलंय. डोळे बंद आहेत, कान बंद आहेत सगळं बंद आहेत. त्यांनी लकव्याच्या गोष्टी करु नयेत.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी बुधवारी घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की,”मागील अडीच वर्षे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. हे सरकार कुठलंही निर्णय घेत नव्हतं. कुठलाही निर्णय न घेणं हाच एक निर्णय त्यांनी घेतला होता. या सरकारला निर्णय लकवा झाला होता. त्यामुळेच कुठलेच निर्णय होत नव्हते.”

पंकजा मुंडे यांच्यावर पक्षावर अन्याय होतो आहे. त्यामुळे त्यांनी मनातली खंत बोलून दाखवली. त्यांचा पराभव कसा झाला हे सगळ्यांना माहित आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“पंकजा मुंडेंचा पराभव कसा झाला, हे…!”

“गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा शून्यातून उभा केला. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे”, असं संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shinde fadnavis government has reached the graveyard said mp sanjay raut scj