राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ व १० जुलै, असे दोन दिवस ठाकरे विदर्भातील शिवसेनेचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. कार्यकर्ते व नेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध पोहरादेवी मंदिरालाही भेट देणार आहेत. हा भाग शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्याबाजूने असलेला बंजारा समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न ठाकरे यांनी यापूर्वीच सुरू केले आहेत. या दौऱ्यात ते यासंदर्भात आढावा घेऊन पावले उचलण्याची शक्यता आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. तेथून ते वाशीम जिल्ह्यात जाणार असून तेथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

हेही वाचा >> पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

“मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर जात आहेत. काय करतील ते? करोनामध्ये दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लागताहेत”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लागतील. एकतर अगोदर अभ्यास करा मग बाकी जीवन सुखाचं. नाहीतर अभ्यास नाही केला तर बाकी जीवन कष्टाचं, असं सूत्र असतं. हे आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना सांगितलं होतं. ते त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं नसावं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा >> “विधानसभेत पाशवी बहुमत जमवून…”, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “व्यापारी बादशहा दिल्लीत बसून..”

उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर का?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यात राहायचे की बाहेर पडायचे याचीही चाचपणी ठाकरे यानिमित्ताने करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात गेलेल्या पक्षाच्या आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न या दौऱ्यात होऊ शकतो. एकूणच पश्चिम विदर्भात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then eknath shinde would not have come to us sudhir mungantiwars comment on uddhav thackerays vidarbha visit sgk