काँग्रेसने ४ ऑक्टोबरला एक पोस्टर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख “सर्वात मोठे खोटारडे” आणि दुसऱ्या एका पोस्टरमध्ये “जुमला बॉय” असा केला होता. यानंतर आता भाजपाने त्या पोस्टला प्रत्युत्तर देत राहुल गांधींचे रावणाच्या रूपातील पोस्टर शेअर केले. दरम्यान, यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले असून ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात आंदोलन पुकारले आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मोदींचा आत्मविश्वास कमी होताना दिसतोय. रावणाची काही ठिकाणी पूजा करतात. पण कुंभकर्णाचं काय? जो झोपेचं सोंग घेतो. मोदी सध्या तेच करत आहेत. ज्वलंत मुद्द्यांवर मोदी बोलत नाही, मौन घेतात. मोदी फक्त हरामाचं खात आहेत, लोकांच्या नावावर खात आहेत. जे ज्वलंत विषय आहेत, त्यावर बोलत नाहीत. त्यामुळे आता लोकांना कळून चुकलंय की खरा रावण कोण आहे”, अशा कठोर शब्दांत प्रणिती शिंदे यांनी टीका केली असून राहुल गांधींना रावणाचं रुप दिल्याने निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> राहुल गांधींचे ‘रावणा’च्या रूपात पोस्टर दाखवल्यावर प्रियांका गांधी आक्रमक; म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि…”

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पोस्टर पोस्ट केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने राहुल गांधींचे रावणरूपातील एक पोस्टर पोस्ट केले होते. त्या पोस्टरला ‘भारत संकटात आहे’ असे हेडिंग देण्यात आले होते.

भाजपाने पोस्ट केलेल्या फोटोवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील X वर प्रत्युत्तर दिले आहे.

”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि जे. पी. नड्डा तुम्ही राजकरण अणि वादविवाद कोणत्या स्तराला नेऊ इच्छिता? आपल्या पक्षाच्या अधिकृत X हॅंडलवरून ज्याप्रकारच्या हिंसक आणि चिथावणीखोर पोस्ट केल्या जात आहेत , त्याला तुमची सहमती आहे का? तुम्ही प्रामाणिकपणाची शपथ घेऊन फार वेळ झालेला नाही. तुम्ही दिलेली वचने विसरलात का?” अशी थेट टीका प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि जे. पी, नड्डा यांच्यावर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: They worship ravana but what about kumbhakarna praniti shindes direct question to bjp on rahul gandhis poster sgk