नांदेड : राज्य विधान परिषदेतील पाच रिक्त जागा भरण्यासाठी येत्या २७ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीत भाजपाने अमरनाथ राजूरकर यांना संधी द्यावी, यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी पक्षाकडे प्रयत्न चालवलेले असतानाच नांदेडमधून अ‍ॅड.चैतन्यबापू देशमुख यांच्यासह संजय कौडगे या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरील पाच रिक्त जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात. पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी व दादाराव केचे या दोघांसोबतच संभाव्य उमेदवारांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे दोनदा विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेले आणि गतवर्षी खा.अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणारे अमरनाथ राजूरकर यांचे नाव बातम्यांमध्ये झळकले असतानाच देशमुख आणि कौडगे यांनी स्वतंत्रपणे चालविलेल्या प्रयत्नांची माहिती बाहेर आली.

मागील काही दिवसांपासून राजूरकर मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. पूर्वी त्यांनी स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत १२ वर्षे प्रतिनिधित्व केले होते. आगामी काळात नांदेड जि.प., नांदेड मनपा आणि जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाला चांगले यश मिळवून देण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून राजूरकरांना आमदारकीचे बळ द्या, अशी खा.चव्हाण यांची शिफारस असली, तरी देशमुख व कौडगे यांनी स्वतंत्रपणे केलेल्या मागणीतून नांदेड भाजपातील जुने विरूद्ध नवे असे चित्र उभे राहिले आहे.

चव्हाण यांनी गतवर्षी भाजपात प्रवेश करताच पक्षाने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली. त्यांच्यासोबत नांदेडमधून पक्षाचे जुने कार्यकर्ते डॉ.अजित गोपछडे यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांच्या कन्येला भोकर मतदारसंघाची उमेदवारी देऊन भाजपाने त्यांना आमदार केले. आता पुन्हा विधान परिषदेसाठी चव्हाणांच्या समर्थकाचे नाव पुढे येत असताना मागील काळात भाजपाचे महानगराध्यक्ष राहिलेल्या अ‍ॅड.चैतन्यबापू देशमुख यांनी याच आमदारकीसाठी राजधानी दिल्ली गाठत पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांची भेट घेतली. तसेच राज्य पातळीवरील देवेन्द्र फडणवीस व अन्य नेत्यांचीही भेट घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यास न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

नांदेडचेच संजय कौडगे हे मागील काही वर्षांपासून पक्षाचे विभागीय संघटनमंत्री म्हणून काम पाहत आहेत. फडणवीस आणि इतर नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध असून तेही विधान परिषदेवर जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात आले. छ.संभाजीनगरमधून संजय केणेकर हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. राजूरकर यांनी मंगळवारी प्रदेश भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या मागणीचे स्मरण करून दिले. त्यांच्यासाठी अशोक चव्हाण यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून माध्यमांमध्ये राजूरकर यांचे नाव झळकल्यानंतर नांदेडमधील त्यांच्या समर्थकांत उत्साह संचारला. आता सर्वांनाच पक्षाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

विधान परिषदेसाठी नांदेडचा विचार होईल का?

गेल्या चाळीस वर्षांमध्ये भाजपाने विधान परिषदेसाठी नांदेडच्या पक्षसंघटनेतून केवळ राम पाटील रातोळीकर यांना २०१८ ते २०२४ दरम्यान संधी दिली होती. गेल्या जुलै महिन्यात त्यांची मुदत संपली. पक्षाने अजित गोपछडे वगळता आपल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांकडून कोणालाही संधी दिली नाही. राजूरकरांचे नाव समोर आल्यानंतर जुने-नवे हा वाद उभा राहिला आहे. पक्षाने अशातच नांदेडमधून दोघांना राज्यसभेवर घेतल्यानंतर वर्षभरात विधान परिषदेसाठी नांदेडचा विचार होईल का, याबद्दल काहींनी शंका व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three candidates from nanded bjp claim ticket for maharashtra legislative council election zws