Premium

बीड जिल्ह्यात एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह; माता-पित्यासह ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांसह ३० जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

three times child marriage of same girl
एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

बीड : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात असताना सर्रासपणे बालविवाहाचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. बावी (ता. शिरुरकासार) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एकदा नव्हे, तर चक्क तीन वेळा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांसह ३० जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “क्षुल्लक कारणासाठी शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा…” खासदार श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?

बीड जिल्ह्यातील बावी येथील एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह शिरुर कासार तालुक्यातील उकांडा चकला येथील तरुणासोबत झाला होता. अल्पवयीन विवाहिता दोन महिने तिथे नांदली. कालांतराने आपसात मतभेद झाल्यामुळे नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. त्यानंतर ही विवाहिता बावी येथे आपल्या आई-वडिलांकडे राहत होती. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाशी तिचा दुसरा विवाह लावून देण्यात आला. तिथेदेखील पतीसोबत न पटल्यामुळे आणि तिचा छळ झाल्यामुळे ती पुन्हा माहेरी आली. काही दिवस माहेरी राहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दहीवंडी येथील नात्यातीलच एका तरुणासोबत ७ जून २०२३ रोजी कोणालाही न सांगता गुपचूप विवाह लावून दिला. तेव्हा तिचे वय १७ वर्षे असल्याचे बाल संरक्षण समितीसमोर आले आहे. 

हेही वाचा >>> सांगली: बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश

एकाच मुलीचा तिसऱ्यांदा बालविवाह झाल्याची माहिती तालुका बाल संरक्षण समिती व चाइल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावरून प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी महादेव जायभाये, सहपोलीस निरीक्षक गणेश धोकट्र, तहसीलदार शिवनाथ खेडकर, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तालुका बाल संरक्षण समिती सदस्य समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बावीचे ग्रामसेवक सिद्धार्थ खेमाडे, सरपंच, अंगणवाडी सेविका यांनी मुलीच्या गावी बावी येथे चौकशी केली असता मुलगी आणि तिचे कुटुंबीय आढळून आले नाही. त्यानंतर याच पथकाने दहीवंडी येथील कठाळे वस्तीवर जाऊन रात्री नऊ वाजता चौकशी केली असता त्या वेळी लग्न न करता साखरपुडा झाल्याचे सांगण्यात आले. परंतु पथक आल्यामुळे नातेवाइकांनी अल्पवयीन मुलगी आणि नवरदेवाला लपवून ठेवले होते. मात्र पोलिसांनी  खाक्या दाखविताच सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांसह लग्न लावणारे, छायाचित्रकार, आचारी आणि छायाचित्रात दिसणाऱ्या व्यक्तींसह २५ ते ३० जणांविरुद्ध ग्रामसेविका सीमा खेडकर यांच्या तक्रारीवरून बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल झाला. या मुलीला काळजी व संरक्षणाची आवश्यकता असल्याने बाल कल्याण समितीने तिला सुधारगृहात पाठवले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 23:46 IST
Next Story
साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना अडवल्याने गोंधळ