राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता ९७वर पोहोचला आहे. राज्यात नव्याने ८ रुग्ण आढळले असून यामध्ये मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे, आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी जनतेशी संवाद साधताना राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली.

आज दिवसभरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना राज्यात नव्या १५ करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता यात पुन्हा आठ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत ११, पुणे, ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबईत प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत ३, सांगलीत ४ तर साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे. सांगतील आढळलेले रुग्ण हे सौदी-अरेबियातून आल्याचे कळते.

महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहतील. मात्र ते वगळून पूर्ण संचारबंदी असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.