सांगली : लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार साहित्य संंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख कार्यवाह कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. तब्बल बारा वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत असून, यासाठी तीन हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, यानंतर विंदा बालमंच, डॉ. शंकरराव खरात ग्रंथ दालन, लोकशाहीर पठ्ठे बापूराव काव्य भिंतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

हेही वाचा – बंडखोर आमदार अपात्र ठरणार? सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाचा आधार घेत अनिल परबांचा मोठा दावा; म्हणाले “याच कारणामुळे…”

संमेलनाच्या पहिल्या सत्रात चला उद्योजक होऊ या विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स ग्रुप लि.), रामदास माने (माने ग्रुप ऑफ कंपनीज), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास ग्रुप इंडिया लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा, मराठी साहित्यात कामगार जीवनाचे चित्र शोधताना, आम्ही का लिहितो?, व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवी संमेलन, कथाकथन याचे आयोजन करण्यात आले आहे. अभिरूप न्यायालय होणार असून यामध्ये हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार हे आरोपीच्या पिंजर्‍यात असतील, असेही श्री. इळवे यांनी सांगितले. यावेळी कामगार कल्याण सहायक आयुक्त समाधान भोसले, अनिल गुरव, नंदलाल राठोड, मनोज भोसले आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two day workers literature conference from friday in miraj ssb