लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परभणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांचे शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला आहे. नांदेड येथील एका कार्यक्रमात कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. कदम यांनी सेनेच्या ‘उबाठा’ गटाकडून नुकतीच गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

बऱ्याच दिवसांपासून श्री. कदम हे उद्धव ठाकरे यांच्या मशालला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा होती. अखेर आज गुरुवारी (दि. ६) त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्या समवेत गणेश कदम, माऊली भोसले, नवनाथ पारवे आदी परभणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

विशाल कदम हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा या शहराचे माजी नगराध्यक्ष असून या शहरावर त्यांचा प्रभाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय असले तरी गंगाखेड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते अस्वस्थ होते. राजकीय पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या काळात पालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची मदत व्हावी तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी अर्थकारण साधले जावे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कदम हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या जिल्ह्यात पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतले असले तरी अजूनही यश आले नव्हते. परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे दोघेही अद्याप उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांची निकड शिंदे यांच्या सेनेला होती. कदम यांच्या रूपाने शिंदे यांच्या शिवसेनेला एक चांगला कार्यकर्ता मिळाला आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची अशीही हॅट्रिक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांनी गेल्या काही दिवसात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय लागोपाठ घेतला आहे. सुरुवातीला संजय साडेगावकर यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आता अजीत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख ए.जे. बोराडे यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. बोराडे यांचा मंठा हा तालुका परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. परभणी लोकसभा मतदारसंघात लागोपाठ तीन जिल्हाप्रमुखांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav balasaheb thackeray shiv sena district chief vishal kadam joined shiv sena in presence of eknath shinde mrj