Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज वरळीमध्ये विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत तर दिलेच, शिवाय देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला आहे. त्यामुळे आता या टीकेला देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“बऱ्याच दिवसांनी राज आणि माझी भेट अशी मंचावरती झाली आहे. आता पंचाईत अशी आहे की त्यांनी मला सन्मानीय उद्धव ठाकरे असं म्हटलं आहे. साहजिकच आहे त्याचं कर्तृत्व आपण सगळ्यांनी पाहिलं. माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्मानीय राज ठाकरे अशीच मी करेन. राजने इथल्या कार्यक्रमाची मांडणी राजने केली आहे. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला.” असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आमच्यातला आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यातला आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. मला कल्पना आहे की अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबं कापतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असतील, रेडे कापत असतील. त्यांना सगळ्यांना सांगतो आहे या सगळ्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. भाषेवरचा विषय जेव्हा निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरुन चालणार नाही. मधल्या काळात आम्ही दोघांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला कुणी ओळखत नव्हता का? राजने सगळ्यांची शाळा काढली पण मला विचारायचं आहे मोदींची शाळा कुठली? भाजपा ही अफवांची फॅक्टरी आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं वगैरे सुरु केलं होतं. आम्ही तुमच्याही पेक्षा जास्त कडवट मराठी बोलणारे देशाभिमानी हिंदू आहोत. १९९२ आणि १९९३ मध्ये जे काही घडलं तेव्हा मराठी माणसांना शिवसेना प्रमुखांनी वाचवलं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आमचा म महापालिकेचाच नाही महाराष्ट्राचाही आहे

प्रत्येक वेळी काही झालं की भांडणं लावायची. आम्ही एकत्र येणार, निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? काहीजण म्हणतात यांचा म महापालिकेचा आहे. नुसता महापालिकेचा नाही तर आमचा म महाराष्ट्राचा आहे. आमची सत्ताही आम्ही काबीज करुन दाखवू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बटेंगे तो कटेंगे म्हटलं होतं तेव्हा वाटलं की हिंदू आणि मुस्लिम करत आहेत. मराठा आणि मराठेतर असा वाद लावून दिला होता. आपण काय यांच्या पालख्यांचे भोई होणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.