Uddhav Thackeray Khasdar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत काल आणि आज दोन भागांमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या मुलाखतीवर सत्ताधारी पक्षांतील अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत ‘ठाकरे ब्रँड’ संपला असल्याचे म्हटले आहे.

७ ते ८ खासदार…

याचबरोबर गिरीश महाजन यांनी एक खळबळजनक दावा केला असून त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षातील, खास करून शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) ७ ते ८ खासदार मनाने आपल्यासोबत आहेत. कायदेशीर अडचणी असल्यामुळे पक्षप्रवेश होऊ शकत नाही.

यावेळी गिरीश महाजन यांनी सर्वच विरोधी पक्षांतील खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आणखी वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या संपर्कात सर्वच पक्षांतील खासदार असून, ठाकरे गटातील सर्वाधिक खासदार संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे ब्रँड तेव्हाच संपला

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे ब्रँड’चा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “ठाकरे ब्रँड केव्हाच संपलेला आहे. बाळासाहेब होते तेव्हा विषय वेगळा होता. २०१९ ला तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला.”

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामार आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या व्हिडिओबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “पोलिसांवर कोणी अरेरावी करत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”